तू खुद की खोज में निकल...!
तू खुद की खोज में निकल...
तू किस लिये हताश है...
तू चल तेरे वजूद की...
समय को भी तलाश है!
...'pink' चित्रपटातली अतिशय मार्मिक अशी ही कविता फार मोठा विचार पोचवते...सगळं काही साध्य होईल...फक्त 'तू' ठरवलं पाहिजे! न कुणाशी स्पर्धा, न तुलना ...स्वतःवर लक्ष केंद्रित करून तू अथक चालत रहा तुझ्या मार्गावर! यावर्षीची महिलादिनाची विशेष संकल्पना - Each for Equal - सगळ्याच स्तरांवर महिलांना समान अधिकार- अशी आहे...! याबाबतीत निश्चितच एकेक शिखर सर करत आहेत महिला अगदी जगभर!...कधी सामाजिक स्तरावर तर कधी कायदेशीर लढाईने! हे अभिमानास्पद आहेच! पिंजऱ्याची एकेक दारं उघडली जात आहेत...पण आकाशात भरारी घेण्याचं काम मात्र तिचं तिला करायचं आहे...!अधिकार त्यांच्याजागी योग्यच पण त्यासाठी ती अधिकाधिक सक्षम कशी होईल? ही विचार करण्याची गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वेगळ्या वाटांवर चालणाऱ्या...किंवा एखाद्या क्षेत्रात वरपर्यंत पोचू शकणाऱ्या मुलींचं/स्त्रियांचं प्रमाण हळूहळू वाढत आहे...पण म्हणावा तसा वेग अजूनही दिसून येत नाही! जास्तीत जास्त मुलींनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ...सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत जे हवं ते साध्य करायला हवं!म्हणून बदल हवा आहे...मुलींच्या, पालकांच्या आणि सगळ्यांच्याच मानसिकतेमध्ये! याच संदर्भात आजच्या दिवशी आपण आपल्याशीच संवाद साधायला काय हरकत आहे....फक्त आणि फक्त आपल्याला केंद्रस्थानी ठेऊन!
up gradation विचारांचं आणि मानसिकतेचं :
मैत्रिणींनो आपण आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी upgrade करू पाहतो...घरातल्या आधुनिक उपकरणांपासून ते अगदी स्वतःच्या त्वचा आणि केशरचनेपर्यंत!अद्ययावत मोबाईल...लेटेस्ट तंत्रज्ञानाचा TV... पण कधी लक्ष केंद्रित केलंय का आपल्या विचार आणि मानसिकतेवरती...?ती काळानुरूप कशी बदलेल? मुलगी, पत्नी, बहीण, मैत्रीण...विशेषतः आईची भूमिका निभावत असलेल्या सगळ्यांनीच विशेष लक्षं दिलं पाहिजे स्वतःच्या मानसिकतेवर! विचार खूप महत्त्वाचे...तेच कृतीला जन्म देतात!
सतत शिकत रहाण्याचा ध्यास:
कुठल्याही वयातल्या स्त्रियांनी वयाची तमा न बाळगता...सतत वाढीचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्याला नक्की काय जमतं, आवडतं हा विचार करून काही करून दाखवण्याची जिद्द हवी. घर, मूल यांना सांभाळून देखील स्वतःची वाढ कायम ठेवली पाहिजे. सध्या गृहिणी सुद्धा मोबाईल आणि सोशल मीडिया यावर कार्यरत असणं यालाच प्रगती समजतांना दिसून येतात! त्याव्यतिरिक्त नवीन तंत्रज्ञान शिकणं...प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी नवीन कौशल्ये आत्मसात करणं ई. गोष्टींकडेही गृहिणींचा कल हवा. आपण सगळ्यांनीच वाचन, व्यायाम, संवाद कौशल्य यावर भर देऊन एका सकारात्मक व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करत राहिलं पाहिजे. म्हणजे घरातल्या मुलींनाही या वातावरणाचा फायदाच होईल! मुळातच आपण मुलींना आर्थिक दृष्टिने स्वावलंबी, स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले पाहिजेत!
नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा पुरुष सहकाऱ्यांबरोबर आत्मविश्वासाने काम करत मोठं योगदान देत आल्या आहात! पण कधीकधी काही वर्षांनी चाकोरीबद्ध कामाचा कंटाळा येऊ शकतो. त्याचा कामावरही परिणाम होतो. अशा वेळी चाकोरी मोडून वेगळा विचार करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होईल, अधिक स्वस्थ आणि आनंदी होईल ते!
आपण बघतो सध्या विवाहित तरुणींमध्ये तणाव जाणवतो. शिक्षण संपवून नोकरी, लग्नं...पुढे मूल अशा जबाबदाऱ्या वाढत जातात. त्याचा परिणाम नात्यांवर, करिअर वर आणि पर्यायाने त्यांच्या आत्मविश्वासावर होत जातो. त्यात विभक्त कुटुंब पद्धती, नोकरीसाठी बाहेरच्या प्रांतात वा देशाबाहेर स्थलांतर, तिथे भावनिक सुरक्षिततेच्या कमतरतेमुळे येणारा एकटेपणा...या आणि अशा स्वरूपाच्या अनेक समस्यांना तरुणी तोंड देत आहेत. त्यातून परिपक्वतेने मार्ग काढता आला पाहिजे...आपल्या क्षमता वाढवून अधिक समर्थ झालं पाहिजे! ...प्रसंगी आपण घेतलेले निर्णय पुन्हा एकदा पडताळून बघावेत! नवनवीन कौशल्यांनी आपलं काम अधिक सोपं,सहज होईल का ते बघावं.आहे त्याच तणावांमध्ये अधिक काळ राहिल्यास त्याचे मानसिक दुष्परिणाम होतात!
निर्णयक्षमता:
मुलींना निर्णयक्षम बनवण्यात सिंहाचा वाटा आहे पालकांचा! मुलींना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यायला प्रोत्साहित करावं...अर्थात त्यांच्या परिणामांची जाणीव परिपक्वतेने करून द्यावी! म्हणजे कॉलेज मधली विषयांची निवड, करिअर, लग्नासारखे महत्वाचे निर्णय त्या सक्षमतेने घेऊ शकतील आणि तुम्ही घेतलेले निर्णय त्यांना समजतील सुद्धा! आजच्या समाजात सुरक्षिततेचं मोठंच आव्हान तरुणींसमोर आहे...खूपच सतर्क राहिलं पाहिजे त्यांनी आणि स्वतःचं आत्मबळ वाढवलं पाहिजे!
अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनी प्रत्येक वयोगटातली स्त्री अधिक सक्षम, समर्थ, निर्णयक्षम, आर्थिक दृष्टिने आत्मनिर्भर आणि स्वस्थ कशी होईल यावर भर दिला पाहिजे. आणि आजच्या युवतींनो...खऱ्या अर्थाने नेतृत्त्वाचा झेंडा आहे तुमच्याच हातात आता! वातावरण खूप मोकळं होतंय...संधी उपलब्ध आहेत...तंत्रज्ञानाची गंगा दारापर्यंत आली आहे! आता कशाची वाट बघायची? मोठी स्वप्नं बघा... जिद्दीने पेटून ऊठा ती पूर्ण करण्यासाठी!विश्वास ठेवा स्वतःवर...स्त्री मधे आहे अद्भुत क्षमता सगळं सामावून घेण्याची...! जिद्द आकाशाला भेदण्याची..इतिहास घडवण्याची! आत्मसन्मान सगळ्यात मोलाचा! तो जपला तर सगळेच तुमच्या अस्तित्त्वाचं मोल जाणतील...तुम्हाला आदर देतील! मेहनतीने ते स्थान तुम्हांला मिळवावं लागेल! कैसे आकाश में सुराख़ हो नहीं सकता...एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)©
- लेखिका, समुपदेशिका.
- (newspaper - 7 मार्च 2020)
Comments
Post a Comment