सहवास...नव्हे..."सहजीवन"!
"आता काय नोकरी सोडणार का?" ..."नाही"...! "मग कसं होणार लग्नानंतर?" किंवा "अगं बाई !अजूनही वेगवेगळेच रहाता का तुम्ही?(अर्थच काय अशा लग्नाला!!!) हे आणि असे अनेक प्रश्न आम्हा defence मधल्या स्त्री-अधिकाऱ्यांना,police,sports,civil services मधल्या माझ्या अनेक मैत्रिणींना नवीन नाहीत. खरंच खूप मोठं आव्हान आहे हे! मला अनेकदा जाणवतं की समोरच्या तरुणीच्या डोळ्यांत महत्वाकांक्षा असते पण तिच्या पालकांकडे तिच्या लग्नाविषयी पडलेले असंख्य प्रश्न असतात! जे त्यांच्या जागी रास्तच आहेत. त्यात तरुणांच्या सवयी इ. समाजाची बदलती परिस्थिती आणखीनच भर टाकते.
एकीकडे वेगळ्या career साठी किंवा एका उदात्त ध्येयासाठी केवळ सहवासाला प्राधान्य न देता...सहजीवनाचं उदात्त मूल्य रुजवणारी वेगवेगळ्या क्षेत्रामधली मी पाहिलेली असंख्य जोडपी...आणि दुसरीकडे "एकत्र" राहूनही मनाने दूर असणारी,त्यात गुदमरणारी (विशेषतः नवीन पिढीतली ) अनेक जोडपी...असं का?याचा माझ्या परीने घेतलेला वेध...!
कुटुंब व्यवस्थेला अनन्य साधारण महत्व आहे, कणाच आहे तो आपला! ...तरीही आपल्याला हे दिसून येईल की नोकरीच्या निमित्ताने पती-पत्नीने वेगळं राहण्याचं प्रमाण आधी defence/police इ.क्षेत्रापुरतं मर्यादित होतं, पण आता इतर अनेक क्षेत्रातही(corporate इ.) ते पसरत आहे . किंवा मागच्या पिढीतही हे होतं पण आता अनेक पटींनी ते वाढतंय. त्यामुळे दोघे एकत्र रहात असोत वा वेगवेगळ्या ठिकाणी ...कुठल्याही परिस्थितीमध्ये सहजीवन सुदृढ...सुंदर कसं करायचं...वाढत्या मुलांचा विचार करून कुटुंब सक्षम कसं ठेवायचं..आणि हे करत असतांनाच आव्हानात्मक careers चं शिवधनुष्य तरुणींनी/स्रियांनी किंबहुना दोघांनी,कुटुंबानेही कसं पेलायचं...याचा विचार करणं ही काळाची गरज आहे!यात कुठलीही टोकाची भूमिका घातकच.
मुख्य म्हणजे वेगळी वाट चालणाऱ्यांनी "सहजीवन" ही संकल्पना समजून, परिपक्वतेने ती स्विकारली पाहिजे. त्यात उदात्त हेतू हवा,मग वेगळं राहणं जाणवत नाही. केवळ पैसा वा भौतिक महत्वाकांक्षा हा हेतू त्यामागे असेल तर ते स्वातंत्र्य कधीकधी स्वैराचाराकडे झुकतं आणि पायाच डळमळतो.म्हणून दोघांनी "एकमेकांचं" होऊन,त्यापलीकडे जाऊन एका ध्येयाकडे चालत राहणं गरजेचं आहे!ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे.म्हणून अशा स्वातंत्र्याचा सदुपयोग हवा.म्हणजे एकमेकांच्या मनात,चिंतनात हे सहजीवन मुरतं. जी "space" मिळते..त्यात स्वतः वाढत राहण्याची क्षमता हवी नाहीतर ते एकटेपणाकडे झुकायला वेळ लागत नाही.स्वतंत्र तरीही..."एकत्र" असा हा वेगळ्या पातळीवरचा प्रवास आहे.
दुसरीकडे आहेत दुसऱ्या प्रकारची म्हणजे सामान्यतः नेहमी एकत्र राहणारी जोडपी. ज्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. यातही अनेक कारणांनी असमाधान जाणवतं.सहवास असतो पण तरीही काहीतरी राहून जातं..निसटून जातं.म्हणून केवळ सहवासात न रमता त्यापलीकडचं सहजीवन समजून घेतलं पाहिजे. ते मजबूत, छान करण्यासाठी अनेक प्रयत्न आवश्यक आहेत. मला वाटतं "continuous growth"...अत्यावश्यक आहे.याचा आपण करत असलेल्या नोकरीशी वा मिळवत असलेल्या पैशांशी संबंध नाही. "वाढ"...मनाची,विचारांची हवी. प्रवास परिपक्वतेकडे नेणारा हवा.अशा दोन सतत वाढणाऱ्या व्यक्ती(स्त्री-पुरुष) एकमेकांना साथ देत अतिशय सुंदर सहजीवन जगू शकतात!
ही परिपक्वता कायमची नात्यात उतरते.छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद,भांडणे यांना थाराच मिळत नाही. सतत वाढीचा ध्यास लागतो. खरंच, नवनवीन चांगल्या गोष्टी स्वेच्छेने आत्मसात करता आल्या पाहिजेत. पृथ्वी ज्याप्रमाणे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते...त्याचप्रमाणे सहजीवनात स्वतःही गतिशील राहिलंच पाहिजे. विशेषतः स्त्रियांमध्ये ही वृत्ती वाढायला हवी. तसा ध्यासच आपण घेतला पाहिजे.नोकरी,घराची जवाबदारी असं कोणतंही काम करत असतांना त्यामागची भूमिका महत्त्वाची.त्यातली स्वेच्छा,सहजता,आनंद महत्त्वाचा.
जे स्वातंत्र्य,space स्त्रियांना मिळणं अपेक्षित असतं, तीच पुरुषांनाही आपण सहज द्यायला हवी. "मी लग्ना आधी हे करायचे..ते करायचे.." असं स्रिया म्हणताना दिसतात पण पुरुषांचंही तसं होतंच.संसार, नोकरी, अपेक्षांचं ओझं यात कुचंबणा व्हायला लागते.वाढण्याच्या ऐवजी विश्व संकुचित होत जातं.म्हणूनच मनाला ताजं ठेवणं गरजेचं आहे. "मला नक्की काय हवंय.. कुठे जायचंय..." हा मुलभूत विचार करण्यासाठी लागणारा एकांत,दोस्तांबरोबर निसर्गात मनसोक्त सहली, व्यक्त होण्यासाठी लागणारे मित्र-मैत्रिणी,चांगली पुस्तकं, सकारात्मक व्यक्तींचा सहवास, छंदांची जपणूक, "देण्याची" सवय लागण्यासाठी एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेमध्ये सक्रीयता,आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या आव्हानांना सामोरं जातांना व्यावसायिक/वयक्तिक पातळीवरती स्वतः ला update ठेवण्यासाठी लागणारा वेळ या गोष्टी दोघांसाठीही अत्यावश्यक आहेत.यातूनच एकमेकांना समजून घेणारं पूरक व्यक्तिमत्व तयार होत रहातं.वाढत्या मुलांसाठी,कुटुंबासाठी वरदानच ठरतं.
आपण स्वतःला चांगले ओळखत असू ...आपला जीवनप्रवास कुठे जायला हवाय...हे clear असेल तर जोडीदारालाही योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि गरज पडलीच तर त्याचा "स्वतःशी" परिचय करून देण्यासाठी खूपच मदत होते.प्रामाणिकपणा,मोकळेपणा,आत्मविश्वास,प्रेम याबरोबरच एकमेकांमधल्या वेगळेपणाचा आदर ...आणि आपल्या मर्यादांची,अपूर्णतेची जाणीवही हवी.
असं असेल तर आयुष्य केवळ सहवासाच्या शृंखलांनी बद्ध होऊन बंदिस्त आयुष्याच्या आश्रयाला जात नाही...तर मुक्त होतं ...हलकं होतं.सहजीवनाच्या सुंदर प्रेरणेने फुलत जातं..बहरत जातं...अर्थपूर्ण होतं! आयुष्यातलं एकमेकांचं अस्तित्वच सहवासापेक्षा जास्त आधार देतं.मग दोघे भेटल्यानंतर एकेक क्षणाचा अक्षरशः उत्सव होतो!
पाडगावकरांच्या काही ओळी... खूप खूप दिवसांपूर्वी वाचलेल्या..तरीही यावेळी अचानक आठवतायत...कुठून...कशा...मनात आल्या खरंच माहित नाही!
जवळपणातही पंखांना आकाश दिसावे
हवे वेगळेपण काहीतरी मिलनातही
सखे आपल्यातून...!
इतुके आलो जवळ जवळ की
जवळपणाचे झाले बंधन...!
जवळ जवळ ये पण सीमेचे भान असू दे
रात्र असो पण पहाट ही वेगळी दिसू दे
स्वर जुळणीतून एक गीत तरी
हवेच अंतर सात सुरांतून...!
इतुके आलो जवळ जवळ की
जवळपणाचे झाले बंधन...!
- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी(नि.)©
(12 जून 2019)
Comments
Post a Comment