मातृतत्त्व - नर्मदा...! पुस्तक परिचय!



यह जीवन है क्या? बतलाऊँ, काँटों  का हैं ताजमहल
यह तन तो मिट्टी हैं जिसमें, कुछ साँसो का कोलाहल ।।
हम कैसे अपने प्राणो की, हवा नहीं स्वीकार करें
हम कैसे अपने जीवन की, कथा नहीं स्वीकार करें ।।

सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठे जायचं नाही, कोणाशी लढायचं नाही...आपला संघर्ष सुरु आहे  सभोतालची परिस्थिती स्वीकारण्यासाठी ...चिंता आहे तिच्यातल्या अनिश्चिततेची..! म्हणूनच आपल्याला प्रेरणा हवी आहे इथून पुढे  सकारात्मकतेने पुढे चालत राहण्याची...!  आज  घरच्या लायब्ररी मधेच  'मातृतत्त्व -नर्मदा' हे  श्री नंदकिशोर गर्गे  यांनी लिहिलेलं पुस्तक हाती लागलं  आणि  त्यावर लिहिण्याची इच्छा झाली! चरैवेति...म्हणजे चालत रहा...चालत रहा या प्रेरणेशी मी तत्काळ जोडल्या गेले आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत हे पोचवावंसं वाटलं! चरैवेति.. मधे चालण्याची  दृढ संकल्प शक्ती, ओढ अध्यारुत आहे!

फारशी  अध्यात्मिक पार्श्वभूमी  नसतांना नुकताच सेवा निवृत्त झालेला एक इंजिनिअर माणूस (लेखक) आपल्या संकल्प शक्तीच्या जोरावर   नर्मदा परिक्रमेला पायी निघतो आणि अनंत अडचणींवर मात करून ती पूर्णही करतो! या जिद्दीची गोष्ट म्हणजेच हे पुस्तक होय! परिक्रमेत ठेवलेल्या नोंदींच्या, निरीक्षणाच्या आधारावर केलेलं  भौगोलिक मार्गदर्शन यात आहेच. त्याव्यतिरिक्त , अनेक गोष्टींचे नव्याने लागलेले अर्थ, उत्सुकता, कधी  शारीरिक वेदना, मानापमान, भीती, टोकाची सहनशीलता, जिद्द, चिकाटी, समर्पण, कधी निखळ आनंद देणारे विविध प्रसंग... हे घोर नैराश्यावर, आपल्या विलक्षण मनोधैर्यानें मात करणाऱ्या सैनिकाचंच जणू  दर्शन घडवतात! आणि बघता बघता मनाचा ठाव घेत विचार प्रवृत्त करणारं मोठं चिंतन आपल्यासमोर ठेवतात...अगदी साध्या, सरळ भाषेत..प्रांजळपणे...पण थेट

नर्मदा परिक्रमा : आत्मशोधासाठीचा प्रवास:

ओंकारेश्वर पासून सुरु होणारी ही नर्मदा नदीची  परिक्रमा म्हणजे भारताचा अमूल्य सांस्कृतिक  ठेवाच ! मुळात हा  आत्मशोधाचा एक प्रवास आहे...प्रत्येकाचा वेगळा! शंकराची मुलगी नर्मदा- मृता तेन नर्मदा! अमरकाही विशिष्ट नियम पाळत, नर्मदेला उजव्या बाजूला ठेवत ही परिक्रमा करतात. सगळी लौकिकाची वलयं मागे  टाकून विश्वास आणि  श्रद्धेची झोळी घेऊन जो जो समर्पित भावनेने जातो तो अनुभव समृद्ध होतो हे लेखकाने कृतज्ञतापूर्वक मांडलं आहे. ठिकठिकाणी आलेल्या लोकांचा सहवास हे अनुभवाचं भांडार आहे..."मी" ला विसरायला भाग पाडणारं! ऊन, वारा, पाऊस, थंडी, चढ उतार, चिखल, काटे...सगळं झेलत अंतःकरणापासून आपला संकल्प स्वीकारून चिवटपणे पुढे चालत  राहायचं- तेही स्वतःला शोधण्यासाठी! स्वतःच्या गरजा अत्यंत कमी होतात आणि  जे थोडंफार  आहे त्यातूनही काही माणूस द्यायला शिकतो. एकटेपणाचं रूपांतर एकांतात होतं. परिक्रमेमध्ये प्रत्येक दिवस  नवीन आव्हानं घेऊन येतो...कधी जेवण मिळतं तर कधी सदाव्रत( डाळ, तांदूळ, मीठ . जे चूल मांडून शिजवून घ्यावं लागतं...वाटून तिथेच संपवावं लागतं). रोजच्या मिळालेल्या अन्नाला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं! या  पुस्तकात तिथल्या भाषेचे अनेक शब्द सापडतात जसं  की माताराम (स्त्रियांना माताराम संबोधलं जातं), पगदंडी (पायवाट), टिक्कड ( जाडसर छोटी रोटी), कितनी मूर्ती है?(किती माणसे आहेत?) .

या परिक्रमेतल्या काही चित्तथरारक गोष्टी वाचून अंगावर काटा येतो. जसं की शूलपाणेश्वराच्या झाडीतून लुटारूंचा भयंकर धोका! तिथलं जंगल  पार करतांना भय, चिंता, संशय सगळ्यांपलीकडे जाऊन लेखकाने "समर्पण" कसं अनुभवलं हे वाचण्यासारखं आहे! तसंच कठपोर, जिथे नर्मदा मैय्या समुद्राला मिळते तिथला अत्यंत कठीण आणि जीवावर उदार होऊन केलेला  बोटीतला प्रवास अंगावर काटा आणतोसंपूर्ण परिक्रमेत कधी अंधारात जेवण, झोंबणारी थंडी, त्यात  कधी पांघरूण नसणं, पहाटे थंड पाण्याने अंघोळ, कधी 40 किमी, कधी 25- 30 किमी  चालणं तर कधी रस्ता चुकल्याने मोठीच्या मोठी  पायपीट! कधी  टपरीवर मिळेल त्याचंच  जेवण - कधी पसाभर  चुरमुरे, गूळ शेंगदाणे, बिस्कीट चा छोटा पुडा असं काहीही! बरं रस्ता तरी कुठे सोपा- पिकं, शेतं, छोट्या नद्या, नाले, झुडपं, बंधारे, टेकड्या, डोंगर,दऱ्या, चढण, शिळा...कायकाय ओलांडायचं! कधी रस्ताच नाही! यात पायाला ठिकठिकाणी जखमा होणं, पाय घसरून चिखलात पडणं, काट्यात अडकून अंगावरचे कपडे फाटणं...नित्याचंच! सगळ्या संकटांवर एकच मात- संकल्पशक्ती!

कोई दिन खाट पलंग सजाना, कोई दिन धूल बिछौना
कोई दिन शाह बने शाहोंके, कभी फ़क़ीरा दीना
रे मन, मस्त सदा दिल रहना...
आन पड़े सो सहना।( स्वामी रंगावधूत)

भारताच्या संस्कृतीचं  अद्भुत दर्शन:  

खेड्यापाड्यातून, डोंगरदऱ्यातून फिरतांना लौकिकार्थाने शिक्षण झालेल्या माणसांचा आदरभाव, आतिथ्य पाहून सद्गदित व्हायला होतं. प्रचंड गरिबी पण त्यातही औदार्याची प्रचीती  येते. वनवासी तसंच आदिवासी वस्त्यांतून  त्यांच्या प्रथा कळतात. अनेक ठिकाणी अजूनही गायीचं दूध वासरांसाठी ठेऊन स्वतः काळा चहा पितात...हे वाचून मी  हातच जोडले. खरंच आपला प्रवास कुठून कुठे जात आहे याची खंत वाटल्याशिवाय रहात नाही. छोट्या  गावामध्ये आजही होणारी मंगलमय पहाट...ब्रह्म मुहूर्तावर घाटाघाटांवर घुमणारे स्तोत्रांचे सूर मनाच्या गाभाऱ्यात साठतात ते कायमचेच!  

अनेक घाटांचे, मंदिरांचे पावन संदर्भ: भारताचं अध्यात्मिक आणि शाश्वत  वैभव:

भारत ही संतांची भूमी आहे. परिक्रमेत असंख्य घाट, नर्मदा तट लागतात...जिथे अजूनही. हजारो वर्षांपूर्वीच्या तपश्चर्या- लहरी आजही जाणवतात! साधू, संतांची मूल्यं, त्यांचं  जीवन जवळून पहायला मिळतं. अनेक उल्लेख पुस्तकात आहेत. सहस्रधारा- जिथे नर्मदा कठीण खडकांना भेदून पुढे जातांना काय संदेश देते मानवाला? अशक्य काहीच नाही! पुढे ब्रह्मावर्त, हनुमंतेश्वर, मणिनागेश्वर, मंडलेश्वर (जिथे मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांचा वाद झाला) , सीताबन (लव कुशचं जन्मस्थान) ...असं कितीतरी स्थळांचं वर्णन, माहात्म्य या पुस्तकात आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगांशी वेगळंच नातं जोडल्या जातं आपलं! अहिल्या बाई होळकरांची राजधानी महेश्वर. तिथली रचना, घाट, स्थापत्य कला...सगळं अचंबित करणारं! तिथेच नर्मदा जयंती चा उत्सव, नावांमध्ये बसून तिला शेकडो मीटर्स ची चुनरी वाहण्याचा कार्यक्रम लेखकाच्या  डोळ्यांचं अगदी पारणं फेडणारा होता! नर्मदे हर!

अद्भुत  सेवाकार्य:

परिक्रमेमध्ये लागणारे ठिकठिकाणचे आश्रम, गोशाळा, धर्मशाळा, त्यांची व्यवस्था, शिस्त यांचा आदरयुक्त उल्लेख पुस्तकात आढळतोप्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सुरु असणाऱ्या  अनेक सेवाकार्यांची प्रचीती येते! समर्पित गावकरी हातभार लावतात. आईच्या मायेने शिदोरी देतात! व्यवस्थेमधल्या  त्रुटींवर किती सहज बोट ठेवतो आपण? पण  त्यापलीकडे जाऊन "भाव" अनुभवायला शिकवते ही परिक्रमा! हे कार्य करणारे सगळे पायी चालणाऱ्या या परिक्रमावासीच्या रूपात नर्मदेचं दर्शन घेतात आणि त्यांचा हा भाव परिक्रमा  करणाऱ्यांनाही नतमस्तक करतो! "नर्मदे हर" चा गुंजारव जीवनशैलीचा भाग होऊन जातो!

नर्मदा परिक्रमा आस्तिक/नास्तिक वादाच्या पलीकडची

 प्रत्यक्ष 2,827 किलोमीटर्स चा पायी प्रवास लेखकाने केला. श्रद्धेचा, साहसाचा आणि संकल्प शक्ती चा  हा प्रवास आपल्याला साशंकतेच्या, सगळ्या वादांच्या पुढे नेतो. श्रद्धेचा एक कवडसा आपल्याही मनात उतरतो हे खरं! लेखक लिहितो की उपाशी झोपता झोपता कुणीतरी उठवून दुधाचा कप हातात ठेवतं, रात्री पांघरूण घेता झोपलं तरी नंतर ते कुणी पांघरलेलं असतं..पायाला मोठी  जखम होऊन आता  चालणं अशक्य असं वाटू लागताच डॉक्टर स्वतः शोधत येऊन dressing करून गोळ्याही देऊन जातो...कधी एकटंच  निर्मनुष्य वाटेवरून  जातांना कुत्रा  येऊन तो 10-12 किमी ची सोबत करत योग्य रस्त्यावर आणून काय सोडतो! अशा कितीतरी गोष्टींमधून समर्पित मनांना   मैय्या दर्शन देत असावी...!!! की  आपण म्हणतो तसं  "when you want something desperately , all the universe conspires in helping you achieve it"...नेमकं काय? ज्याचं त्याने ठरवायचं! लेखकाला हे  जाणवतं...ती वसते सेवाकार्यांमधल्या समर्पित व्यक्तींमध्ये...अनेक ठिकाणी रस्ते,नाले पार करवणाऱ्या छोट्या मुलांमध्ये...प्राण्यांमध्ये..चराचरामध्ये..आणि सगळ्यात महत्वाचं- प्रत्येक मातेमध्ये, स्त्रीमध्ये! संपूर्ण परिक्रमेमधले अनुभव  म्हणजेच नर्मदा मैय्याला  अनुभवणं...तिचीच  प्रचिती घेणं! हे सगळं 'मातृतत्त्व- नर्मदा ' या पुस्तकामुळे कळलं , तसंही माझ्या  वडिलांनी ते  लिहिल्यामुळे मला अतिशय जवळचं आहे.   जसं फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं नाही, तसंच, परिक्रमा म्हणजे 'केवळ चालणं' नाही...ती आहे अनुभूती, स्वतःचा शोध आणि समर्पण! त्यातल्या जिद्दीमुळे, संकल्पामुळे आपल्या तरुण पिढीलाही आपलं ध्येय साध्य करण्यासाठी  अशी पुस्तकं प्रेरक वाटतात!

उदासीनता, नैराश्याने खचून गेला पार मनू 
भीतीच्या या  चाहुलीने गलितगात्र झाली तनू 
यःकश्चित या मरणाची तू भीती आमुची दूर कर 
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!नर्मदे हर
मन्मनीची आर्त इच्छा माऊली तू पूर्ण कर!
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!नर्मदे हर

- मेजर मोहिनी गर्गे- कुलकर्णी (नि.)©

Comments

Popular posts from this blog

जय हिंद सर - श्रद्धांजली...!

निरामयआरोग्यवर्धिनी जीवनशैली आणि बरंच काही