गुढी संयमाची..गुढी निश्चयाची..गुढी भारताची!
एकांतातही बंधुत्त्वाची...
उसळत्या...तरी थबकणाऱ्या
मनां- मनांतील ऊर्जेची...!
जनहितास्तव लढणाऱ्यांच्या
अथक, निरंतर समर्पणाची...
गुढी निश्चयाची...गुढी भारताची!
सशस्त्र शत्रू तुटून पडला
कधी निसर्ग कोपून बरसला
त्सुनामीचा हाहा:कार कधी...
भूकंपाने घासच गिळला...!
पचवली आक्रमणे किती...
त्या विजयांच्या स्मरणाची...!
गुढी निश्चयाची...गुढी भारताची!
पुन्हा उठलो, सावरलो अन्
आधारिले जगतासही...
आहे कोणता विषाणू जो
मनांस पोखरू पाही?
या अभेद्य मनाच्या सामर्थ्याची...
शक्ती, शांती आणि ऐक्याची !
गुढी संयमाची... गुढी भारताची!
वाटे क्षणिक आता
कसा सरेल अंधार
पसरली निराशा, भीती अन्
जगी वाढता संहार...!
या अंधाराला घालवणाऱ्या
तेजस्वी..प्रखर सूर्याची...!
गुढी संयमाची... गुढी भारताची!
देईल दिलासा मना...
खेळेल पुन्हा उल्हास!
संयम आणि निश्चय आपला
घडवेल नवा इतिहास!
दुर्दम्य आशावाद घेऊनी
आली पहाट नव वर्षाची...!
गुढी निश्चयाची... गुढी भारताची!
- मोहिनी गर्गे- कुलकर्णी.
(25 मार्च 2020)
Comments
Post a Comment