एक महत्त्वाचा संवादसेतू - स्वेच्छापत्रं!
(कोरोना...त्यातून मृत्यूचा संभव...आणि म्हणून स्वेच्छापत्रं (Will) असा या लेखाचा हेतू मुळीच नाही. सध्या lockdown मुळे अंतर्मुख होण्याची संधी आहे. म्हणून ज्यांनी हे महत्त्वाचं काम अद्याप केलेलं नाही त्यांनी वेळेचा सदुपयोग करून याचा विचार करावा...स्वेच्छापत्रं लिहिण्यासाठी प्रवृत्त व्हावं...एवढंच यामागचं प्रयोजन).
आपण जाणतोच की आजचं युग हे संवादाचं युग आहे. अगदी साधी गोष्ट...सध्या घरात बंद असलो तरी इथे fb वर connected असल्याने सुरक्षित वाटतं कारण आपण 'संवाद' साधत असतो सगळ्यांशी! पण हे आपोआप घडतं का? नाही. "communication works for those who work at it." म्हणून संवाद साधण्याची इच्छा असणं...त्यादृष्टीने प्रयत्न करणं महत्त्वाचं! कारण आपल्या आयुष्यात कुठल्याही स्तरावर आलेला communication gap आपल्याला दूर नेतो, ज्यामुळे आपली घुसमट होते. अशाच प्रकारची एक मोठी दरी तयार होते...दोन पिढ्यांमधे...मनातल्या ईच्छा प्रकट न होता कायमच्या मनातच राहून गेल्यामुळे! ही पोकळी केवळ अपूर्णताच मागे ठेवते असं नाही तर अनेकदा गैरसमजांना, वादांना देखील जन्माला घालते, नाती उध्वस्तही करते! ही दरी भरून काढण्यासाठीच महत्त्वाचा संवाद सेतू म्हणजे स्वेच्छापत्रं(Will)! म्हणून...स्वेच्छापत्राचा विचार करण्यासाठी अंतर्मुख होणं, ते लिहिणं...ही काळाची, सुदृढ नात्यांची गरज आहे! काय विचार करताय? हा लेख केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे? मुळीच नाही...माझ्यासकट सगळ्या तरुण मित्र मैत्रिणींनी सुद्धा हे सगळं समजून घेतलं पाहिजे!
मी सैन्यात निवड झाल्या क्षणापासूनच माझं स्वेच्छापत्रं लिहीत आणि update करत आले आहे...तसा नियमच आहे आमच्याकडे! स्वेच्छापत्राला आपल्याकडे (दुर्दैवाने) 'मृत्युपत्रं' असं म्हणतात....अतिशय निराशाजनक असा हा शब्द आहे, Will या शब्दाला मुळीच समानार्थी नाही. आपण त्या ऐवजी "स्वेच्छापत्रं" हाच सकारात्मक शब्द वापरला पाहिजे. कॉलेज मधे हे अभ्यासलंय पण सध्या हे आठवायचं कारण म्हणजे माझे बाबा गेल्या काही दिवसांपासून सहज घरी आलेल्या मित्र, नातेवाईक, इ. सगळ्यांनाच स्वतःहून स्वेच्छापत्राची संकल्पना समजावून सांगतात आणि स्वेच्छापत्राचे काही नमुनेही देतात. ते वकील नसतांनाही याबाबत जागृती करत आहेत. यात मला खूप विशेष असं काही वाटत नव्हतं. पण त्यांना मित्रांकडून सुरुवातीला ज्या प्रतिक्रिया आल्या त्यामुळे एकूणच समाजाची याबाबतची स्थिती लक्षात आली! काही (अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा) प्रतिक्रिया अशा होत्या-
1."अरे बापरे...सरळ मृत्यपत्रं!...अरे मला BP, शुगर काही नाही...अजून वेळ आहे थोडा!"
2. "अरे मला तर एकच मुलगा आहे...माझं सगळं त्याचंच आहे...याची काय आवश्यकता!"
3. "कोण ह्या वकिलाच्या भानगडीत पडणार...यातलं काही कळत नाही बुवा आपल्याला"
4."माझी दोन्ही मुलं फार समजदार आहेत...प्रॉपर्टी चं काही नाही...कशाला हवंय स्वेच्छापत्रं?". इत्यादी इत्यादी! पण बाबांकडून जरा(?) स्पष्ट बोल ऐकून गेल्यावर मात्र 'अमृत पिऊन आलेल्या' या सगळ्यांमध्ये हळूहळू फरक पडत गेला!
खूपच मोठं अज्ञान आहे याबद्दल आणि ही महत्त्वाची बाजू सुशिक्षित लोकांकडूनही अत्यंत दुर्लक्षित आहे अजूनही! नंतर मात्र खूपच विचार करायला लावणाऱ्या प्रतिक्रिया लोकांनी कळवल्या:
1.एक काकू म्हणाल्या "दोन्ही मुले परदेशात. हल्ली सतत विचार मनात यायचा...घर,प्रॉपर्टी,माझ्या साड्या..माझी भांडी...माझी पुस्तकं...माझं स्त्रीधन...जीव गुंतलाय...याचं काय होणार नंतर ? मी वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुलांशी बोलले...त्यांच्या पुढच्या आयुष्याबद्दल जाणून घेतलं आणि स्वेच्छापत्रं तयार केलं !आणि खरंच हो...सगळा ताण हलका झाला!" .
2. एक काका म्हणाले "आम्ही उगाच ह्या मुलासाठी इकडे फ्लॅट घे...मुलींसाठी तिकडे प्लॉट घे, दागिने कर...यातच गुंतलो आत्तापर्यंत! स्वेच्छापत्राच्या विचाराने एकदम भानावर आलो! "investment" चा खरा अर्थ कळला....!"
3. अनेकांना 'वारसा' नेमका कशाचा सोडायला हवा याचा साक्षात्कार होऊन त्यांची दिशाच बदलली.
4. सधन कुटुंबातल्या अनेकांनी आपल्या मुलांची आर्थिक सुस्थिती लक्षात घेतली. आणि आपल्यानंतर स्वेच्छापत्राद्वारे आपण समाजाला कितीतरी गोष्टी सहज देऊ शकतो हे त्यांना मनोमनी पटलं...जमिनीपासून ते अगदी भांडी, कपडे इथपर्यंत!
स्वेच्छापत्रं म्हणजे नक्की काय?
याचा शब्दशः अर्थ म्हणजे आपल्या इच्छांचं लिखितरित्या प्रकटीकरण! भारतीय वारसा हक्क कायदा, 1925 प्रमाणे व्यक्तीच्या (स्वकष्टार्जित/ स्वतःच्या नावावर असलेल्या) मालमत्तेसंबंधी जी इच्छा तिच्या मरणानंतर पूर्ण केली जाते अशा गोष्टींचं (कायदेशीर) प्रकटीकरण म्हणजे स्वेच्छापत्रं! निधनानंतर स्थावर आणि जंगम मालमत्तेची करायची विल्हेवाट दाखवणारं हे पत्रं! पुढे देहदान, नेत्रदान यासाठीही वेगवेगळे इच्छापत्रं करण्याची पद्धत रूढ झाली. (इथे 4 पानांचा फोटो टाकलेला आहे. तो फक्त नमुना आहे. आपण आपल्या नुसार ते लिहू शकतो).
तरुणांनी स्वेच्छापत्रं ही संकल्पना आणि त्यासंदर्भातले कायदे का समजून घ्यावे:
सगळ्यांत आधी लक्षात घ्यावं की आईवडिलांनी तरुण, mature मुलांशी मोकळा संवाद साधायला हरकत नाही. त्यांना विश्वासात घ्यावं. "माझ्यानंतर सगळं याचंच आहे" एवढ्यावर राहू नये. कारण पालकांना अचानक हॉस्पिटल मधे हलवल्यावर सगळ्याच प्रकारची व्यवस्था बघतांना किंवा त्यांनी अकस्मात हे जग सोडून गेल्यावर... मुलांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आपल्याच भावंडाना, जवळच्या अनेक नातेवाईकांना सावरावं लागतं! वडील रोड अपघातात अकस्मात गेल्यावर पुढची अनेक वर्षं कोर्टात स्वतःलाच सिद्ध करायची वेळ आलेले काही मित्रं मी जवळून पाहिलेत! खूपच मनस्ताप देणारं असतं हे! तसंच, मोकळ्या संवादाची जवाबदारी आपल्या तरुण पिढीची सुद्धा आहे! माझ्या एका मैत्रिणीचा गावाकडे रहाणारा तरुण मामा नुकताच हृदय विकाराने गेला. दोन लहान मुले आणि देणेकऱ्यांची रीघ! काहीही कळायला मार्ग नाही. अशा वेळी कुटुंबाला, विशेषतः पत्नीला/पतीला विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं होतं ! म्हणून भावनावश न होता, निःस्वार्थीपणे तसंच तटस्थपणे या गोष्टींना आधीच समजून घेतलं पाहिजे. बँक, इन्शुरन्स, नवनवीन तंत्रज्ञान याप्रमाणेच महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भातले कायदेही आपल्याला माहित हवेच! नाही का? त्यातलाच एक वारसा हक्क कायदा!...आणि आपणही आज कुणाचेतरी पालक आहोत...किंवा त्या भूमिकेत जाणार आहोत...हेही विसरू नये!
आज मुले परदेशात,परप्रांतात जाण्याचं, स्थायिक होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. त्यामुळे छोट्या मतभेदांना, भावनांना धरून न बसता वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. आईवडिलांनी स्वतःच्या आयुष्याची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवणंसुद्धा फार महत्वाचं आहे. एकटं रहात असतांना स्वतःचं आरोग्य, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी (शरीर थकल्या नंतर परिचारिकेची व्यवस्था सुद्धा यात आली), आणि त्या पश्चातच संपत्ती ची विल्हेवाट अशा सगळ्या तरतुदी स्वेच्छापत्राद्वारे आत्ताच करून ठेवता येतात. सतत त्या गोष्टीची चिंता करून वा सर्वस्वी मुलांना त्यासाठी दोष देऊन स्थिती बदलत नाही. त्यातून मार्ग काढता आला पाहिजे!
स्वेच्छापत्राची खरंच का आवश्यकता आहे?
1.स्वेच्छापत्रं केलेलं नसेल तर त्या व्यक्तीची मिळकत वारसाहक्क कायद्याप्रमाणे वाटून टाकली जाते. पैसा विभागल्यामुळे त्या व्यक्तीची अत्यंत जवळची माणसं जसं की पत्नी, मुलं ज्यांना विशेष आर्थिक जरुरी आहे त्यांना तो पूर्णपणे मिळत नाही.
2. एकच वारस(मुलगा/ मुलगी) असतांना अनेकदा स्वेच्छापत्रं केलं जात नाही.तेव्हा काही दूरचे नातेवाईक कायद्याचा आधार घेऊन हक्क सांगू शकतात आणि खऱ्या वारसाला तो वारस असल्याचं कोर्टात सिद्ध करत बसावं लागतं! अशा परिस्थितीमधे स्वेच्छापत्रं हा भक्कम पुरावा ठरतो!
3. व्यक्ती स्वतःच्या कष्टाने जे मिळवतो त्याची पत्राद्वारे वाटणी हीच त्याच्या वृद्धापकाळी सुरक्षितता, स्वाभिमान आणि सौजन्याची वागणूक याचं मोठं साधन ठरू शकतं. आपण परावलंबी झालो तर...आपलं म्हातारपणी कोण करणार?या चिंतेने ज्येष्ठ नागरिक निराश होतात, मनाने खचतात. पण आपला पैसा शेवटपर्यंत आपल्याच कामी कसा येऊ शकतो...यासंबंधी वेगवेगळ्या तरतुदी त्यांना आत्ताच करता येतात. ही मिळकत आधीच वाटून टाकली तर त्याने परावलंबन येऊ शकतं!..."नटसम्राट" सारखी परिस्थिती न ओढवणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. म्हणून स्वेच्छापत्रात आपण नेमक्या कोणत्या इच्छा व्यक्त करणार आहोत किंवा लिखित स्वेच्छापत्रं मुलांना आधीच दाखवण्याची मुळीच आवश्यकता नाही. ते सील करून बँकेत किंवा कुठे ठेवलंय एवढी माहिती त्यांना सांगू शकता, तेवढी पुरेशी आहे.
4. कुठल्याही सामाजिक कार्याला, व्यक्ती वा संस्थेला सामाजिक भावनेतून मिळकतीचा हिस्सा देण्यासाठी स्वेच्छापत्रं हे अतिशय उत्तम साधन! मोठा हिस्सा द्यायचा असल्यास ते आधीच ठरवणं अवघड जातं म्हणून स्वेच्छापत्राद्वारे मरणोत्तर दान केलेलं उत्तम!
5. आपण गेल्यानंतर भावंडांमधे गैरसमज न होता उलट अधिक घट्ट व्हावं...असं वाटणाऱ्या पालकांनी निश्चितच स्वेच्छापत्राचा विचार केला पाहिजे. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आत्ता जाणवत नाहीत...नंतर मात्र घडतांना दिसून येतात!तसंच आपल्याच मुलांमध्ये आर्थिक समानता नसेल तर तो समतोल स्वेच्छापत्राद्वारे साधता येतो.
6. प्रत्येक स्त्रीला आपल्या नावावर असलेल्या मालमत्तेची, स्त्रीधनाची (सासर माहेरून मिळालेल्या दागिन्यांची) वाटणी आपल्या इच्छेनुसार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. ती ते स्वेच्छापत्राद्वारे स्वतंत्रपणे करू शकते. आत्मविश्वासाने आणि विवेकाने त्यांनी ते जरूर करावं!अगदी पतीही त्यावर हक्क सांगू शकत नाही. म्हणून पती-पत्नी यांनी संयुक्त स्वेच्छापत्र न करता वेगवेगळं करणंच अंमलबजावणीच्या दृष्टीने योग्य ठरतं! त्याशिवाय घरातली भांडी, साड्या...सगळंच स्त्रियांना त्यांच्या इच्छेने सुना, मुली वा सामाजिक संस्था यांना देता येतं! आसक्ती सोडून या दृष्टीने विचार करणं जमलं पाहिजे... बास!
7. देहदान/ नेत्रदान: असं श्रेष्ठ दान स्वेच्छापत्राद्वारे करता येतं. उदा. नेत्रदानासाठी इथे 'परिशिष्ट क' हा नमुना जोडला आहे. अगदी सोपं आहे. ते भरून, जवळचा नातेवाईक आणि फॅमिली डॉक्टर च्या सह्या घेऊन नेत्रपेढीस नेऊन देता येतं. असं कोणतंही दान अंमलात आणते वेळी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. (चष्मा, मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींना सुद्धा नेत्रज्ञान करता येतं). याबाबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्रज्ञान इ. शी संबंधित स्वेच्छापत्रं वेगळं लिहून त्याची नातेवाईकांना व्यवस्थित माहिती द्यावी. कारण बरेच वेळा स्वेच्छापत्रं मृत्यूनंतर उशीरा उघडण्यात येतं आणि नेत्रज्ञान काही तासांच्या आत करावं लागतं.
8. स्वेच्छापत्रं हे केवळ मालमत्तेविषयीच असतं असं नाही. अगदी छोट्या गोष्टी, महत्त्वाच्या भावना, इच्छा, काही अटी सुद्धा त्याद्वारे सहज पोचवता येतात. ज्यामुळे माणसे उर्वरित आयुष्य तणावरहित पद्धतीने जगू शकतात! काही तजवीज करायची असेल तर तीही करता येते.
स्वेच्छापत्रासंबंधीचे नियम:
यासाठी काही विशिष्ट रचना नाही. अगदी साधा पांढरा कागद, काळी शाई हे लिहिण्यासाठी पुरेशी आहे. स्टॅम्प पेपर/स्टॅम्प ड्युटी लागत नाही.
स्वेच्छापत्रं कोणत्याही भाषेत लिहू शकता. फक्त ते अतिशय स्पष्ट आणि नेमकं असावं, निःसंदिग्ध असावं. (तिथे दागिन्यांचे/मालमत्तेचे फोटोही जोडू शकता).
स्वेच्छापत्रं शक्यतो स्वतःच लिहावं आणि त्यावर स्वतःची सही करावी. नसेल करता येत तर डाव्या हाताच्या अंगठ्याचीही तरतूद आहे.
स्वेच्छापत्रासाठी कमीत कमी 2 साक्षीदार लागतात. ते शक्यतो वयाने लहान असावेत आणि लाभार्थी (ज्यांना स्वेच्छापत्राद्वारे काही मिळणार आहे असे)नसावेत. स्वेच्छा पत्र करणारा आणि 2 साक्षीदार अशा तिघांनी एकाच वेळी सह्या कराव्यात. पत्र करणाऱ्याने त्यांच्यासमोर प्रत्येक पानावर सुद्धा सही करावी म्हणजे त्यात कोणालाही बदल करता येत नाही.
स्वेच्छापत्राची नोंदणी- Registration: -
Registration Act, 1996 (Sec. 40, 41) नुसार स्वेच्छापत्राचं रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे असं नाही. पण रजिस्ट्रेशन चे फायदे असे आहेत: 1.त्यामुळे स्वेच्छापत्राची वैधता सिद्ध होते. 2. स्वेच्छापत्राविषयी कोणतेही वाद असल्यास, म्हणजे उदाहरणार्थ एकावेळी 2 सारखेच स्वेच्छपत्र उपस्थित केले गेले तर अशा वेळी रजिस्ट्रेशन केलेल्या स्वेच्छापत्राला जास्त ग्राह्यता दिली जाते. 3. स्वेच्छापत्रं गहाळ झाल्यास रजिस्ट्रेशन ऑफिस मधून त्याची कॉपी मिळवता येते.
स्वेच्छापत्रात बदल करता येतो का? ते पूर्णपणे बदलता येतं का?
स्वेच्छापत्राला पुरवण्या जोडता येतात ( codicil). पुरवणी जोडायची असल्यास तिला स्वेच्छापत्रं करतानाचे वर उल्लेख केलेले सही, साक्षीदार वगैरे सगळे नियम तंतोतंत लागू पडतात. दुसरं स्वेच्छापत्रं सुद्धा लिहिता येतं. ते करत असतांना आधीच्या स्वेच्छापत्राचा तारखेनिशी उल्लेख करून 'ते रद्दबादल समजावं' असं स्पष्टपणे लिहिणं अत्यावश्यक आहे. नाहीतर नवीन स्वेच्छापत्रंच रद्द समजलं जातं. दबावाखाली कुणी ते बदलू नये यासाठी हे असे तोडगे आहेत हे लक्षात घ्यावं.
स्वेच्छापत्राच्या अंमलबजावणीसाठी 'व्यवस्थापकाची' नेमणूक :
स्वेच्छापत्रात केलेल्या व्यवस्थेप्रमाणे कारवाई केली जाण्यासाठी ते करणाऱ्या व्यक्तीने व्यवस्थापक नेमावा/ नेमावेत. त्यांची नावं स्वेच्छापत्रात नमूद करावीत. यावर जास्त गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. सोपं आहे. हे लाभार्थीही (म्हणजे स्वेच्छापत्राद्वारे मिळकत ज्यांना मिळणार आहे असेही) असू शकतात. अत्यंत विश्वासू हवे. जवळचा नातेवाईक, मित्र, बँक, एखादा वकील असं कुणीही असू शकतं. त्याला कल्पना देऊन मगच त्याची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करून तसा उल्लेख स्वेच्छापत्रांत करावा.
गोष्ट छोटी...डोंगराएवढी: तसं पाहिलं तर एकीकडे वाटतं काय आहे त्यात! पण केल्यानंतर त्याचा परिणाम खूप मोठा असतो! इच्छा असणाऱ्या आपल्या पालकांनाही कायदा समजून सांगण्यासाठी मदत करा. अनेक पीडितांना यातून आधार मिळतो.वर अगदीच मोजक्या अशा कायदेशीर गोष्टींचा उल्लेख केला आहे. अधिक जाणून घ्या. याबाबत अनेक छोट्या पुस्तिकाही मिळतात, त्या वाचा. वकील मित्रांची मदत घ्या!
स्वेच्छापत्रासाठी याद्या करायला घ्याल, आठवणींमधून फेरफटका मारून याल ...तेव्हा जे वाटतं ते शब्दातीत आहे! हा अनुभव घ्याच! तरुणांना या विचारमंथनातून कदाचित 'वारसा' शब्दाशी जवळीक वाटेल...थोडी आपुलकी निर्माण होईल...पालकांची मनस्थिती समजून घ्यायला मदत होईल...किंवा काहीजण स्वतःचा वारसा खूप व्यापक, दूरपर्यंत पोचवण्याच्या ध्यासाने झपाटून जातील! त्याची संकल्पनाच पार बदलून टाकतील! "The testament of a man lies not in the magnitude of possessions and property left to his heirs, but the reach of his legacy long after his death!"
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)©
(21 एप्रिल 2020)
Comments
Post a Comment