निमित्त मातृत्त्वाचं - शोध स्वतःचा...!
या lock down च्या काळात, सदैव बाहेर पळू पहाणाऱ्या आपल्या लहान मुलांना घरात गुंगवून ठेवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या आई, आजींना विशेष नमन आणि विश्वातील समस्त मातृशक्तीला वंदन! आपण सगळे आपल्या आईविषयी अनेकदा कृतज्ञता व्यक्त करत असतो...पण 'देणाऱ्याचे हातच घ्यावेत’ याप्रमाणे त्यांच्या पिढीकडून आपण काय घेऊन पुढे जात आहोत...तसंच आपल्या पिढीच्या मातृत्वाविषयी,आव्हानांविषयी बोलणंही आवश्यक आहेच ! काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितलेलं त्याचं मत खूप गाजलं होतं की पर्यावरणाचा खूप ऱ्हास होत आहे...म्हणून लोकसंख्येवर आळा घालणं गरजेचं. यासाठी आम्ही मूल होऊ दिलं नाही. हा एक विचार! तसंच एकीकडे व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता किंवा एक माणूस म्हणून फक्त पैशांसाठीच नव्हे तर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, आत्मसन्मानासाठी घराबाहेर पडणारी स्त्री...आणि दुसरीकडे मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, समुपदेशक यांचे कळकळीचे सल्ले की मुलांचं वर्तन आणि इतर समस्यांवर प्रभावी उपाय तसंच त्यांच्या सुदृढ मानसिक वाढीसाठी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे मुलांच्या सुरुवातीच्या काही वर्षांत पालकांचा, विशेषतः आईचा सहवास! अशा प्रकारे दोलायमान मनस्थितीमध्ये आजची आई उभी आहे. अनेकांना मनातून कितीही वाटलं की मी नोकरी आणि मूल छान प्रकारे 'मॅनेज' करत आहे...तरी त्याही परिस्थितीत त्या आईची ताणतणावांमधून सुटका नाहीच! तसंच तिला नेमकं काय हवंय हाही विचार मागे पडतो आणि आयुष्य चाकोरीबद्ध होऊ शकतं. अगदी वेगळं करिअर असणाऱ्या पोलीस, पायलट, एअर सर्विसेस, आर्मी ...यांच्या मातृत्त्वाच्या साहसकथा तर कल्पनातीत आहेत! मातृत्वाच्या आव्हानांमुळे आज अनेक तरुणी "no kid" या निर्णयाकडे सर्रास वळत आहेत. या परिस्थितीमध्ये तरुण आईंनी स्वतःचा नव्याने शोध घेतला तर...?
एका कार्यशाळेच्या निमित्ताने लेखन, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सुप्रसिद्ध महिलांशी, त्यांच्यातल्या 'आईशी'संवाद साधण्याची आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याची मला संधी मिळाली. ही कार्यशाळा होती, "mom preneures and reinvention." या विषयावर. mom- preneur हा नवीन शब्द अलीकडे जगभरामध्ये प्रसिद्ध होत आहे. याचा नेमका अर्थ ' स्वतःचा व्यवसाय वा करिअर सांभाळत मातृत्त्वाचा आनंद घेणं.' भारतात हे नवीन नाही. पण आताच्या वातावरणात आव्हानात्मक मात्र निश्चित आहे. तसंच याचा हा अर्थ सरळ वाटत असला तरी काही जणींच्या बाबतीत हा प्रवास मात्र खूप वळणांचा असतो! कारण शिक्षण घेऊन उद्योग सुरु करणं एवढंच यात नाही तर 'मातृत्त्वाच्या निमित्ताने स्वतःचा शोध घेणं' ही खूप मोठी प्रक्रिया त्यांच्यामधे घडते...हे विशेष आहे!
लग्नानंतर योग्य संधीची वाट बघत, आई झाल्यानंतर, मूल सांभाळून स्वतः ला जे आवडतं ते सुरु करणाऱ्या महिला आपल्याला दिसतातच. पण 'reinvention' चा संदर्भ असा की उच्चशिक्षित किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये प्रस्थापित होऊन करिअर मध्ये उच्च पदावर पोचणाऱ्या महिला 'आई ' झाल्यावर अनपेक्षितपणे बदलतात. एका क्षणाला त्यांना असं जाणवतं की मी हे शिक्षण घेतलं, नोकरी केली पण आता दिवसाचे अनेक तास त्यासाठी बाहेर राहावं असं मला वाटत नाही. किंवा काहीजणींना जाणवतं मला खरं तर मनातून अजून काही तरी वेगळं करायचं होतं, संधीच मिळाली नाही...आता थोडं थांबून विचार करूया! काही असंही म्हणतात की कॉलेज, करिअर च्या गोंधळात जीवनाच्या अनेक सुंदर आयामांना स्पर्श करायचा राहून गेलाय. आता काय हरकत आहे- स्वतः च्या मुलीबरोबर नव्याने आयुष्य जगायला... भरभरून जगत, पुन्हा संपूर्ण ऊर्जेनिशी मग आपल्या आवडत्या क्षेत्रात झेप घ्यायला...आपण आपल्या मुलाचा प्रवास बघू आणि मूल आपल्या प्रवासाचा साक्षीदार होईल! या निमित्ताने पालक म्हणून,पत्नी, अगदी माणूस म्हणूनही आपण समृद्ध होऊ!
आता हेच बघाना- काही क्षेत्रांमध्ये (software etc) मागच्या 10-15 वर्षांत प्रचंड वाढ झाली. त्यात मुलींचाही सहभाग लक्षणीय आहे. मध्यमवर्गीय मुलामुलींचं आयुष्य एकदम पालटलं!अचानक उंचावलेली जीवन शैली, घर,गाडी हे आलं पण त्यासाठी घेतलेली कर्ज, मूल, पती-पत्नींची व्यस्तता आणि एकूणच जबाबदारीमुळे अनेक तणाव निर्माण झाले. शिवाय अशा परिस्थितीतून पुढचा प्रश्न निर्माण होतो - मूल कोणी सांभाळायचं? विभक्त कुटुंब पद्धती, कामाच्या निमित्ताने स्थलांतरित होणं, प्रसंगी राज्याबाहेर वा देशाबाहेर रहाणं, एकूणच लग्नं आणि मूल होण्याचं वय वाढल्यामुळे बाळाच्या आजी-आजोबांची थकलेली शारीरिक आणि मानसिक क्षमता अशा कितीतरी समस्या आहेत. क्षमता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला दिसून येतो. गेल्या काही वर्षांत ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे! याही वयात त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य, करिअर वा स्वतः चे इतर व्याप असणं असे अनेक पैलू आहेत. या सगळ्या कारणांनी प्रश्न आहे तसाच रहातो.
अजून एक महत्त्वाचा पमुद्दा म्हणजे "पॅरेंटिंग"!!! आपण ज्यात वाढलो ते वातावरण आज अस्तित्वातच नाही. internet किंवा इतर कारणांनी बदललेल्या वातावरणामुळे दिवसेंदिवस पालकत्त्वाच्या आव्हानांमध्ये भरच पडत आहे! चारी बाजूंनी समुपदेशक, मानस शास्त्रज्ञ ,शिक्षिका, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यावर एकच उपाय वारंवार सांगत आहेत- मुलांना सुरुवातीचे काही वर्षं पालकांनी, विशेषतः आईने आपला सहवास दिला पाहिजे. त्यांच्या शारीरिक गरजा भागवणं याही पुढे जाऊन मुलांमधे involve झालं पाहिजे. ही सुरुवातीची वर्षं पुढे पूर्ण आयुष्यात मुलांचा भक्कम आधार होतात, त्यांना भावनिक सुरक्षा देतात, त्यांचा बौद्धिक पाया मजबूत करतात.
पण शेवटी हे कोडं सोडवायचं कसं? करिअर आणि मुलांची वाढ! तर आपण प्रामाणिकपणे आपल्या कामाचा उद्देश, त्यातून स्वतःला मिळणारा आनंद, आपल्या गरजांची व्याख्या आणि पैशांचं गणित ...हे सगळं पुन्हा एकदा तपासायला काय हरकत आहे! यंत्रवत न वागता...थोडा श्वास घेऊन स्वतःशी संवाद साधला तर गोष्टी स्पष्ट होतील!
मला अनेक मैत्रिणी भेटल्या ज्यांनी करिअर चा एक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आणि मातृत्त्वाच्या टप्प्यावर त्या जरा विसावल्या. जरा शांतपणा मिळाल्यावर त्यांना अनेक गोष्टी जाणवल्या. एका इंजिनिअर मैत्रिणीने स्वतः चे तबल्याचे क्लासेस सुरु केले! कुणी लेखिका , कुणी समुपदेशिका, कुणी dress designer... असं काय काय स्वतंत्र काम सुरु केलं...स्वानंदातून अर्थार्जन! संपूर्ण वेगळीच दिशा घेतली पाहिजे असं काही नाही. काही वकील, डॉक्टर अशा व्यवसायातल्या मैत्रिणींनी कामाचे तास कमी केले. मूल लहान असतांना मधल्या वेळात घरी अभ्यास करून स्वतः ला update करून घेतलं त्यांनी. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला हा निर्णय!
यावरून 'मी अतिशय उच्चशिक्षित आहे म्हणून त्या प्रमाणात पैसा कामवायलाच हवा' हा विचार थोडा मागे पडू लागला आहे. यशाचे आणि समृद्ध जीवनाचे मापदंड बदलायला सुरुवात झाली आहे!
तुम्ही म्हणाल हे 'reinvention' फक्त स्त्रियांसाठीच का? तर तसं अजिबातच नाही.
अनेक बाबाही मुलांना वेळ द्यावा म्हणून अशा प्रकारची विचार सरणी प्रत्यक्षात आणत आहेत. सतत फिरतीची नोकरी, किंवा ज्यात मुलांना, कुटुंबाला अजिबात वेळ देता येत नाही असं काम सोडून स्वतः ला आवडतं, ज्यात अर्थार्जन आणि कुटुंबाला वेळ देणं हे दोन्ही बॅलेन्स होऊ शकेल असं काम स्वीकारण्याची समंजस मानसिकता पुरुषांमध्येही वाढत आहे.यात कुठेही महत्त्वाकांक्षेवर घाला बसत नाही उलट आपल्यासमोरचे मार्ग स्पष्ट होतात. तसंही...मागच्या मध्यमवर्गीय पिढीतल्या अनेकांना परिस्थितीमुळे काम आवडलं नाही तरी ते करणं क्रमप्राप्त होतं. त्या पिढीने पाया तयार केल्यामुळे आजची नवीन पिढी तुलनेने आर्थिक दृष्टीने बरी आहे, धाडसी आहे, निर्णयक्षम आहे. पत्नी अगदी वेगळ्या क्षेत्रात आहे जिथे तिला ब्रेक घेणं शक्य नाही, तिथे पती अशा प्रकारे विचार करून मुलांच्या सोयीने काम करतांनाही दिसतात. अनेक आजी आजोबांनी ठरवून करिअर किंवा त्यांची practice थांबवली.
या निमित्ताने मला असंही सांगावंसं वाटतंय की गृहिणींनी देखील स्वतःचा शोध घ्यायला हवा. स्वतःसाठी वेळ काढायला हवा. फक्त राहणीमानावर केंद्रित न होता स्वतः साठी गुणात्मक वेळ देणारी, स्वतंत्रपणे नवीन काही शिकणारी, किंवा लेखन वाचन करणारी, स्वतःला update ठेवणारी आई, मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन संवाद साधणारी आई...मुलांना निश्चितच जास्त भावते. पुढे जाऊन आवडत्या कामातून अर्थार्जन झालं तर आणखीन आत्मविश्वास वाढतो! सतत वाढण्याची ओढ लागते आणि फक्त गरजा भागवण्यासाठी पैसे कमावणं म्हणजे करिअर नसून त्यामध्ये आपली आवड ,ध्यास असणं हे जास्त महत्त्वाचं आहे हा विचार मुलांमध्येही रुजतो.(आणि यामुळेच "आई कुठे काय करते!" हा विचारही मुलांना शिवत नाही).
निर्णयामागे परिपक्वता हवी:
ब्रेक घेण्याचा विचार करून ज्या महिला मूल होतांना/झाल्यानंतर अचानक करिअर सोडून देतात त्यांच्यासाठी हे खूप अवघड वळण असतं. आयुष्यात एकदम झालेला बदल, सतत ची जागरणं, सोडलेलं करिअर...त्यांना मनातून खंत वाटत रहाते. की मूल मोठं होणं याची नेमकी व्याख्या कोणती? आता पुन्हा कधी आपण आपलं काम सुरु करू शकतो...सगळीच अनिश्चितता समोर दिसत रहाते. म्हणून आवश्यकता आहे ती आपल्या निर्णयामागे आपली भूमिका स्पष्ट ठरवण्याची. दृढ आणि परिपक्व विचार करण्याची -तोही निर्णय घेण्या आधीच! त्यामुळे गोष्टी स्वीकारणं खूप सोपं होत जातं. थोडा ब्रेक घेऊन मातृत्त्व अनुभवणं हा धाडसी निर्णय तेव्हाच पचनी पडेल..जेव्हा तुमचा स्वतःवर ठाम विश्वास असेल! आयुष्याचा हा टप्पा मला भरभरून देणार आहे अशी तुमची श्रद्धा असेल. मग स्वतःला शोधात अनेक पटीने ऊर्जा घेऊन तुम्ही आवडत्या कामाकडे परत झेपावणार आहात असा ध्यास मनात कायम राहील! शेवटी माणसाचं आयुष्य म्हणजे काय...तर त्याने घेतलेले निर्णय...आणि त्यांचा परिणाम!
आपण मानव निसर्गाचा, पर्यावरणाचा एक भाग आहोत...महत्त्वाचाच! त्यामुळे त्यावर अन्याय नको वा लोकसंख्येमुळे आईच होणं टाळलं तर पर्यावरणाचा विचार करणाऱ्या, निसर्गाचं संवर्धन करणाऱ्या, लोकसंख्येला लोकशक्तीत परिवर्तन करून त्यात इतिहास घडवणाऱ्या मानवांची अपेक्षा करणार तरी कोणाकडून? त्यांना घडवणार कोण आणि कसं?इतरांची नव्हेच...ही आई म्हणून माझी जवाबदारी आहे! यातून सुटका नाही.
आपल्याला मातृत्त्वाचं सुंदर निमित्त मिळालंय...पुन्हा नव्याने जगण्यासाठी! नव्याने शिकण्यासाठी! नव्याने जग अनुभवण्यासाठी! शेवटी आई बाबांच्या सहवासाला पर्याय असू शकत नाही! मग काय...घेताय ना स्वतःचा शोध ...नव्याने...जिद्दीने...आत्मविश्वासाने!
हे गाणं आठवतंय? आपल्यातलं आईपणही असंच म्हणत असेल...
Give me some sunshine...give me some rain...
give me another chance...wannnna grow up once again!
- मेजर मोहिनी गर्गे - कुलकर्णी (नि.)©

Comments
Post a Comment