निमित्त...सावित्रीचं...!
साहित्यातल्या काल्पनिक कथा, कादंबऱ्या,चित्रपट, मालिका, अगदी web series मधल्या काही नायिका...आत्मविश्वासपूर्ण वावर असणाऱ्या, अन्यायाला मोडून काढणाऱ्या, विचार करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या...! या नायिका आपल्या मनावर नेहमीच दीर्घकाळ छाप सोडतात.आपल्या आठवणीत रहातात. त्यांची सकारात्मक भूमिका खूप काही शिकवून जाते असं आपण मानतो. या नायिकांना आपण "आपलं" मानतो. मग वर्षानुवर्षे...महाभारत काळापासून आजपर्यंत जिचा उल्लेख टिकून राहिलाय...अशा सावित्री नावाच्या धैर्यवान नायिकेबद्दल आपण उदासीन का राहावं?किंवा तिच्याशी अनेक जुने वा केवळ कर्मकांडांचे संदर्भ जोडून तिला संकुचित का करावं? श्रद्धा- अश्रद्धा, सत्य-असत्य,पौराणिक-आधुनिक यापलीकडे जाऊन तिच्यातल्या अजेय स्त्रित्वाला,सतीत्वाला का म्हणून खऱ्या आयुष्यात "आठवू" नये...?
मला आजच्या दिवशीच काय पण अनेकदा सावित्रीची आवर्जून आठवण होते. वड,सात जन्म,नवरा, यम यांचे कथेतले संदर्भ, लहानपणी आईचं बोट धरून...गजबजलेल्या, अश्वस्थ वडाच्या परावरती जाण्याची माझी आठवण इ.सगळं मागे सोडून ...या सगळ्यांच्या खूप पलीकडे जाऊन सावित्री माझ्यापर्यंत पोचते ती तिच्या कालातीत गुणांमुळे! जे आजही तितकेच relevant आहेत!
सगळ्या शास्त्रांमध्ये निपुण असणारी ही राजकन्या...धैर्याचं,शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण! तिच्या लग्नाच्या वेळी तिने दाखवलेली स्वतंत्र बुद्धीची चुणूक, निर्णय क्षमता, वडिलांचा मिळवलेला विश्वास, स्वतःच्या निर्णयाची शेवटपर्यंत घेतलेली जवाबदारी...नात्याविषयी दाखवलेली commitment आणि प्रतिकूल परिस्थितीतही बुद्धिचातुर्याने, चिवटपणे अक्षरशः खेचून आणलेलं सर्वस्व! यातलं आजच्या स्त्रीसाठी काय आवश्यक नाही? आज नोकरी-व्यवसाय, घर असं समर्थपणे पेलणाऱ्या स्त्रिया, पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही विजयाचा झेंडा रोवून चिवटपणे,जिद्दीने टिकून रहाणाऱ्या स्त्रिया, वेगवेगळ्या विरोधांना न जुमानता अगदी संसदेत आपलं नेतृत्व करणाऱ्या खऱ्या नायिका, वाईट सवयी वा दारूच्या आहारी जाणाऱ्या आपल्या नवऱ्याला आत्मबळाच्या जोरावर वठणीवर आणणाऱ्या महिला, एवढंच काय पण प्रसंगी वडिल, भाऊ, नवरा, मुलगा अशा सगळ्या नात्यांना जोडून ठेवत वेळप्रसंगी त्यांनाही आधार देणाऱ्या ,मार्ग दाखवणाऱ्या आपण स्त्रिया....डोळे उघडून पाहिलं तर कितीतरी रूपे सावित्रीची!
म्हणूनच...आज मी उपवास करावा का, वडाला फेऱ्या माराव्यात का, जन्मजन्मांतरीचं हे नातं आहे काय? असे कोणतेही प्रश्न मला गोंधळात टाकत नाहीत. हे स्पष्ट आहे की सावित्रीच काय पण प्रत्येकच गोष्ट आपण आजच्या संदर्भानुसार विचारपूर्वक बदल करूनच स्वीकारली वा पुढे नेली पाहिजे. तरीही... दोरा सुतवत फेऱ्या मारणाऱ्या आणि त्या निमित्ताने तिची कहाणी आवर्जून वाचणाऱ्या...किंवा पर्यावरणाचा ध्यास घेऊन आजच्या दिवसाचं औचित्य साधून वडांची लागवड करणाऱ्या... किंवा वर्षानुवर्षे तिचं नाव कानावर पडत आल्याने आज तिची नुसती "आठवण" काढणाऱ्या... आणि आपापल्या रणांगणावर चौफेर लढणाऱ्या सगळ्याच भगिनींचा मी आदर करते. सावित्रीचा चिवटपणा, सहनशक्ती, ध्यास, धैर्य, बुद्धिचातुर्य...सगळ्या गुणांपुढे नतमस्तक होते!
तुम्ही म्हणाल की यात विशेष काय? अवती भोवती इतके आदर्श असताना...सावित्रीच का? अगदी खरंय. निमित्त सावित्रीचं... कारण खूप उपहास होताना आपल्याला दिसून येतो. मला वाटतं कोणतेही पूर्वग्रह न ठेवता...ममत्व आणि समत्व बुद्धीने... सावित्रीसारख्या अनेक नायिका/व्यक्तिमत्त्व त्यांच्या पौराणिक प्रतिमांमध्ये किंवा केवळ कर्मकांडामध्ये न अडकवता आपण स्मरल्या पाहिजेत. मूळ इतिहास वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या निमित्ताने तेव्हाच्या अनेक गोष्टी कळतात. एकूणच प्रवाहाचा अंदाज घेण्यासही मदत होते.
अस्तिकता/ नास्तिकता या आपापल्या भूमिकेसह, धर्मस्वातंत्र्यासह, विचारस्वातंत्र्यासह प्रत्येकानं वावरावं...डोळसपणे! तरीही प्रत्येक प्रश्न केवळ बुद्धीच्या जोरावर सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या पिढीने थोड्याशा लवचितकतेने एक झरोका नक्कीच उघडा ठेवावा...ज्यातून आत येईल एक कवडसा...श्रद्धेचा! तिथूनच जुन्या आणि नवीन विचारांमधली सकारात्मकता आपल्यापर्यंत थेट पोचू शकेल...कालानुरूप बदल घडवत, संदर्भहीन किंवा obsolete गोष्टी मागे टाकत, उद्यासाठी अशा घेऊन! विचारभेदांसह एकमेकांना समजून घेण्याची थोडीतरी शक्यता निर्माण होईल. स्त्रियांच्या दृष्टीने कधीच न सुटणाऱ्या कोडयांना समजण्याची, मोकळेपणाने स्विकारण्याची किंवा धैर्याने बदलण्याची मनोवृत्ती तयार होईल!....सत्यवानाला नेण्यासाठी आलेल्या एका यमालाच काय पण नवरा,मुले, कुटुंब, राष्ट्र ...यांच्यावर सावट धरणारे कैक यम ती स्वबळावर परतून लावेल...निदान तेवढा आत्मविश्वास तिच्यात जागा होईल!
(16 जून 2019)
Comments
Post a Comment