मंद आचेवर...!
स्वतःविषयी व्यक्तं व्हावं/ काही लिहावं असं कधी मनात आलं नाही.पण थोडंसं वेगळ्या वाटेवर चालल्यामुळे कधी होणार-या मुलाखतींमधून तर कधी अनेक ठिकाणी "leadership"/ "personality development" /parenting" ,माझे अनुभव अशा विविध विषयांवर स्वतंत्रपणे बोलताना ...काही गोष्टींची उकल करताना, काही विचार देताना... पुन्हा पुन्हा मागे वळून बघण्याची संधी मिळत असते आणि स्वतःच्या आईबाबांजवळ मन नकळत पोचतं. हे अनुभव वैयक्तिक न राहाता सगळ्यांसमोर व्यक्त होतात आणि आणखीनच ऊर्जा निर्माण करतात. याचाच पुनरानुभव घेण्यासाठी, मला गप्प न बसू देण्या-या मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव आईविषयी काही लिहिण्याचा प्रयत्न करतेय...
".... मंद आचेवर!"
माझ्या सुगरण आईला कुठलीही रेसिपी विचारली की तिच्या उत्तरामध्ये "....आणि मंद आचेवर खरपूस भाजायचं/तळायचं...." हा उल्लेख आल्याशिवाय राहात नाही. मला नेहमी प्रश्न पडतो ...किती वेळ उभं राहायचं गॅस जवळ ...किती वेळ वाट बघायची...आणि सारखं काय मंद आचेवर!!! पण आता कळतंय....मंद आचेवर पदार्थ बनवायला लागणारे तिचे हे patience फक्त त्यापुरते मर्यादित नाहीत तर तिच्या पूर्ण आयुष्यातच ते व्यापून राहिलेले आहेत.तिच्या अस्तित्वातच ती सहनशक्ती,तो चिवटपणा,ती इच्छाशक्ती..सगळं ठासून भरलंय. जालन्यातली एक सामान्य गृहिणी ते माझ्यातल्या अधिका-याला घडवणारी आई, आणि अधिकारी असलेल्या सुनेला प्रेमाने साथ देणारी सासू अशा अनेक पैलूंनी तिच्या कर्तृत्वाची कमान ऊंच गेली आहे म्हणून मला तिचा प्रवास कौतुकास्पद वाटतो . चांगले संस्कार आणि स्वच्छ चारित्र्याची पूंजी घेऊन अनोळखी जगामध्ये एकट्याने प्रवेश करताना, स्थिरावताना ...तसंच एक स्त्री अधिकारी म्हणून अंतस्थ प्रेरणेने काम करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वातलं पालकांचं, विशेषतः आईचं योगदान किती मोलाचं आहे हे जाणवतं!
आईची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे मराठवाड्यातल्या अगदी लहान गावामध्ये झालेला जन्म,तिचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने घर,लहान भावंडं यांची जवाबदारी, पुढे पदवीनंतर लगेच झालेलं लग्न, सासूबाईंच्या अकाली निधनामुळे सून म्हणून आलेली संपूर्ण कुटुंबाचं दायित्व ज्यात प्रामुख्याने कडक शिस्तीच्या सासऱ्यांच्या सांभाळ, व्रत-वैकल्ये, पुढे मी आणि भाऊ...इ.इ.!!! तिच्या पिढीतल्या स्त्रियांसाठी यातल्या काही गोष्टी कदाचित विशेष नसतीलही पण तरीही आमच्या पिढीला हे दिव्या वाटतच! .वडिलांची M.S.E.B. मधली नोकरी, तिथल्या संघटनांमधे सक्रीयता, नाटकाची आवड,सामाजिक संस्थांमधला सहभाग...आणि हे सगळं समरसून करण्याची वृत्ती यामुळे घर आणि मुले प्रामुख्याने आईकडे! बाकी सगळं सांभाळताना, अनेक गोष्टी सहन करताना '"आई" चा कप्पा मात्र तिने कायम वेगळा ठेवला.त्यावर कशाचाच परिणाम तिने होऊ दिला नाही.ही गोष्ट शिकण्याचा मी आजही प्रयत्न करतेय.
लहानपणी मला सारखं वाटायचं की आपली आई इतर काही निवडक महिलांसारखी "smart" ..."bold" असावी,दिसावी. तिने स्वतःसाठी बाहेर पडावं...अर्थातच औरंगाबाद ला आल्यावर हळू हळू तिच्यात बदल होत गेले. तिथली badminton खेळणारी आई आठवली कि अजूनही छान वाटतं. पण तिच्या विचारांमधली आधुनिकता किंवा उंची जाणवायला मला अजून काही वर्षे लागली...महाविद्यालयीन जीवनामध्ये तिच्याकडून मिळालेलं "जवाबदार" स्वातंत्र्य,माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. विशेष म्हणजे "शिवाजी" जन्मावा पण दुसऱ्यांच्या घरात...अशी परिस्थिती आजही आहे! १०-१२ वर्षांपूर्वीच काय पण अजूनही रुळलेल्या वाटा सोडून वेगळं career करू बघणाऱ्या मुलांना, विशेषतः मुलींना,सुनांना होणारा विरोध समाजात दिसून येतो.पण माझया बाबतीत असं कधीच घडलं नाही. कुठलीही पाईश्वभूमी नसतांना माझं सैन्यातलं खडतर आयुष्य अत्यंत संवेदनशील असलेल्या "आईने" धीराने face केलं...मलाही कधीच खचू दिलं नाही. आई म्हणून तिला होणारा त्रास, वाटणारी काळजी तिने कधीच मला अडसर होईल या पद्धतीने व्यक्त केली नाही...आणि मी पुढे जात राहिले.
माझ्याबरोबर भारताच्या विविध राज्यांमध्ये आई आवर्जून येत जात असे. तिचा जास्त काळ सहवास सुरुवातीच्या काळात मला मिळाला. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन हा टप्पा प्रत्येक मुलाने,अनुभवावाच असा आग्रह मी नेहमी धरते. विशेषतः मुलींनी. प्रचंड मेहनत करून आपलं स्वप्नं सत्यात उतरल्यानंतर आपण आईला त्या विश्वात नेतो...मोकळा श्वास घेतो ...एकत्र धमाल करत तिच्याशी नव्याने नातं जोडतो...यात "आई-मुली" चा जो मैत्रीचा bond तयार होतो..त्याला तोड नाही. ते विश्व बघून माझ्याविषयीचं कौतुक तिच्या डोळ्यांमधून सारखं पाझरायचं ! अशा "आम्ही दोघीच '' भरपूर फिरलो आहोत अगदी कश्मीरच्या द-याखोऱ्यांमध्ये सुध्दा! ते दिवस आठवून आम्हाला फार ऊर्जा मिळते अजूनही!
तिच्या अशा येण्या-जाण्यामुळे मी कुठेही एकटीच राहत असले तरी सगळ्या सुखसोयी आणि स्वातंत्र्य असतानासुद्धा बेभानपणे न जगता जवाबदारीने कसं रहायचं ही शिस्त मला आईने लावली.खूप गमती-जमतीही आठवतात.आई येऊन गेल्यानंतर आजूबाजूचे सगळे शेजारी अधिकारी मला आपोआप ओळखत. बोलायला येत.मला आश्चर्य वाटे. मग कळलं की ही आईची जादू आहे. स्वतः सगळ्यांशी ती ओळख करून घेत.मागोमाग तिने केलेले पदार्थांचे नमुनेही त्यांच्याकडे पोचत. ..authentic maharatrian food! देवपूजेसाठी ती कोणाकोणाच्या बागेतून सुंदर फुले आणायची(अजूनही ती हे सगळं करते). हे करत असताना कोण किती मोठे अधिकारी आहेत,कुठल्या प्रांतातले आहेत, english मधल्या संभाषणाचं दडपण...असे कोणतेही प्रश्न तिला कधीच पडायचे नाहीत.आत्मविश्वासपूर्ण असा तिचा वावर असायचा."महाराष्ट्रीयन हिंदी' मध्ये अतिशय आदबीने,मोजकंच पण मोकळेपणाने,साधेपणाने केलेला संवाद प्रत्येकाला आवडत असे. ती घरी परत गेल्यानंतरही तिची सगळेजण विचारपूस करत राहायचे. हे तिचे नकळत केलेले प्रयत्न एकट्या राहणाऱ्या माझ्या सुरक्षिततेसाठी किती मोलाचे होते,चातुर्याचे होते... हे आता कळतंय!
फक्त career च्या सुरुवातीलाच नव्हे तर माझं लग्न, नंतर अनुक्रमे २ मुली आणि service बरोबरच वाढत्या कौटुंबिक जवाबदा-या यातही आईची भक्कम साथ मिळाली.दोन्ही पातळ्यांवर सक्षम कशी राहील याची ती काळजी घेत असे. अनवट वाटेवरच्या मी आणि माझी वाहिनी अशा दोघीना,आमच्या मुलांना सांभाळताना ...बरोबरच आम्हाला स्वावलंबी करताना आई अजूनच उलगडायला लागली.
खरंतर वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे त्यामुळे आपण '"आईसारखं " व्हावं असं लहानपणापासून फारसं वाटायचं नाही.पण माझ्यातल्या "'आईपणाच्या" प्रवासापासून आईचा खूप विचार मनात येत राहतो. तिच्या कितीतरी गोष्टी कशा आपल्यात रुजल्यात ...वाढताएत! माझ्या मुलींपर्यंत तर ती फारच लवकर पोचली...त्यांच्यात झिरपली! "मला आजीसारखं व्हायचंय...तिच्यासारखं छाssssन cooking करायचंय" यातच सगळं आलं! प्रश्न फक्त त्या स्वयंपाकाचा नसतो...त्या उत्साहाचा, प्रेमाचा,समरसून... प्रामाणिकपणे हातात घेतलेलं काम व्यवस्थित करण्याचा असतो...! जावई,सून,नातवंडं सगळ्यांना सामावून घेत ,आपलंसं करत "unconditional" प्रेम ती करत आली आहे!
आज छोट्या छोट्या गोष्टीचं credit घेण्यासाठी आजची पिढी धडपडते..."माझं सगळं छानच असणार !!" अशा अविर्भावात असते! पण कुठल्याही recognition वा appreciation शिवाय वर्षानुवर्षे अंतस्थ प्रेरणेने काम करणं किती अवघड आहे.आई तर माझ्या कुठल्याही यशावर,गुणांवर बोलतांना 'माझं काही नाही ...ह्यांच्यावर गेली आहे ती" म्हणून सहज बोलून मोकळी होते! आणखी एक विशेष म्हणजे "आमच्या वेळी असं होतं ..तसं होतं..." म्हणून कशाचाही अट्टाहास करताना तिला मी पाहिलं नाही. उलट आता पुढच्या पिढीचं जीवन,आव्हानं सगळंच बदललंय हे स्वीकारून माझ्याबरोबर गर्भसंस्कार clasess ला येऊन नव्याने सगळं जाणून घेणारी आई! ''असंच कर' असं न म्हणता "आपण असं करून बघूया का" असा विचार ती करते...आणि माझ्यातली आई नवीन प्रयोगांसाठी सज्ज होते!
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती वेगवेगळ्या स्वरूपात मार्गदर्शन करत अली आहे. Career करत असतानाचा टप्पा ज्यात महत्वाकांक्षा,प्रचंड मेहनत,चांगलं काम करून दाखवण्याची जिद्द हे सगळं जसं तिने पाहिलं तसंच आता थोडा जास्त वेळ स्वतःसाठी,मुलींसाठी देणं गरजेचं आहे असाही आग्रह तिने केला. अर्थात वेगळ्या स्वरूपात नव्याने काम सुरु करण्याच्या माझ्यातल्या ऊर्जेचा स्रोत पुन्हा एकदा आईबाबांपाशी जाऊन मिळतोच .
"मंद आचेवर'... अर्थात स्वतःचं काम शांतपणे, एकाग्रतेने निरंतर सुरु ठेऊन... पुढच्या पावलाइतक्याच प्रकाशाची अपेक्षा बाळगत हळू हळू पण अखंडपणे पुढे जात राहण्याची वृत्ती असं मी म्हणेन.म्हणूनच शांतपणे जगणारी आई मला अनुकरणीय वाटते. "घेणा-याने एक दिवस देणा-याचे हातच घ्यावेत" या ओळींप्रमाणे तिच्याविषयी लिहिण्याबरोबरच तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करत राहणं हे माझ्यासाठी जास्त समाधानकारक आहे!
- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)©
(17 में 2019)


👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteFar Sundar!!
ReplyDeleteखूप धन्यवाद पुष्कराज!
ReplyDelete